तहसील विभागाच्या ताब्यातील जप्त जेसीबी गायब

Foto
वाळू माफियांना कुणाचा वरदहस्त ?

गंगापूर, (प्रतिनिधी) :  येथील नवीन तहसील कार्यालयाची इमारत अत्याधुनिक स्वरूपात उभारण्यात आली असून परिसराला दोन स्वतंत्र प्रवेशद्वार आहेत गंगापूर तालुक्यातील शिवना नदीपात्रातील अवैध वाळू उपशावर महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली असतानाच वाळू माफियांनी प्रशासनालाच उघड आव्हान दिल्याचे चित्र
समोर आले आहे.

महसूल पथकाने कारवाईदरम्यान जप्त केलेल्या दोन महागड्या जेसीबी मशीन अज्ञातांनी चक्क पळवून नेल्याच्या दोन धक्कादायक घटना घडल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकारामागे केवळ चोरी आहे की कुणाचे संगनमत, असा गंभीर सवाल उपस्थित होत आहे. शिवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा सुरू असल्याच्या तक्रारीनंतर महसूल विभागाने काही दिवसांपूर्वी कारवाई करून जेसीबी व इतर वाहने जप्त केली होती. मात्र कारवाईनंतर जप्त करण्यात आलेली वाहने सुरक्षित ठेवण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप होत आहे. विशेष म्हणजे जप्त केलेली वाहने तहसील कार्यालयाच्या ताब्यातूनच गायब होत असल्याने महसूल विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

-- नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी -- 
स्थानिक नागरिकांमध्ये याबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, नावालाच कारवाई केली जाते, प्रत्यक्षात वाळू तस्करांवर कोणती ठोस कारवाई होत नाही, अशी चर्चा सुरू आहे.
काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल केले जात असले तरी त्यानंतर पुढे काय कारवाई होते, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती दिली जात नसल्याचा आरोपही होत आहे.

कार्यालयीन जप्त वाहने बाहेर कशी गेली
दोन गेट, आणि कार्यालयीन जप्त वाहने बाहेर कशी गेली, याबाबत नागरिकांमध्ये संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामागे निष्काळजीपणा की संगनमत, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.